-तनवी.
मी मुलगा आहे, म्हणजे माझ्या आदराचे स्थान नेहमी दुय्यम. स्त्रियांचा आदर, मान, सन्मान करावा असं नेहमी म्हंटल्या जातं. पण असेही नाही कुठे लिहिलेले की पुरुषांचा आदर स्त्रियांच्या पाठी मागणं करावा. एखाद्या स्त्रीच्या पोटी बाळ जन्माला येतं, त्याचा नऊ महिन्याचा रहिवास हा तिच्या पोटी असतो मात्र ती माय जरी एक नवा जीव जन्माला घालणारी असली, तरीही त्या बाळाच्या पुढील आयुष्याचं ओझ बाळाच्या बापावरच येऊन कोसळतं. तो त्याचं दुःख जरी दुसऱ्यांना सांगत नसला तरीही तो त्याच्या मनात बळबळत असतो.
तो दुसऱ्यांना आपले दुःख सांगो अथवा न सांगो, त्याचं त्यालाच सोसावं लागतं. ना बायकोशी तो आपल्या मनातली खंत सांगत, ना कुणाजवळ. सांगून करुन कुटुंबाच्या पोटापाण्याचा भार त्याच्याच डोक्यावर लादलेला असतो. तो आपल्या मुखातून जरी बोलत नसला तरीही त्याचं चित्त विचारांनी रडत असतं. स्त्रिया बोलून आपली दुःख व्यक्त करतात तर पुरुष तोंड न उघडताच सर्व सोसत असतात.
गेल्या काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे, लखनऊ मधील कृष्णानगर येथील एका स्त्रीने भर रस्त्यावर एका पुरुषाला धक्का बुक्की केली. त्याचं काही ऐकून न घेताच त्याला बदाबदा मारलं. त्या पुरुषाने विचार केला की भर रस्त्यावर एका स्त्रीच्या अंगावर आपण हात घालणे म्हणजे केवढा आपण पापी ठरू. तो काही न बोलता मुकाट्याने त्या स्त्रीचा मार सहन करत राहिला. आजूबाजूने लोकं बघत उभी होती, पण व्हिडिओ काढण्यात व्यस्थ होती. म्हणजे आता इथे जे घडतंय ते सोशल मीडियावर टाकायचं, पण मदत करायची नाही. जो तो तिथे चाललेलं बघत होता पण त्या पुरुषाला त्या स्त्रीच्या फटकाऱ्यातून कोणी वाचवत नव्हत.
पुरुष आहे म्हणुन काय झाल..? त्याला त्याचा त्रास होत नसणार का..? की, ती अंगावर बितनारी स्त्री आहे म्हणून तसाच तिचा मार झेलत बसायचं. जर त्या पुरुषाच्या ठिकाणी तिच स्त्री असती तर तिला वाचवायला कोणी ना कोणी तरी गेलं असतं. पण दुर्दैवाने तो पुरुष होता. तो त्या स्त्रीला दोन हानू ही शकला असता पण त्याने तसे केले नाही कारण, मानसन्मान आदर या गोष्टी त्याला त्याच्या चित्तेतून अडवत होत्या. आणि त्या स्त्रीच्या नजरेतून या गोष्टी अंधारल्या होत्या. एवढे होऊन करुन त्या स्त्रीने केलेले त्या पुरुषावरचे खोटे आरोप बघणाऱ्या लोकांना पटत होते मात्र त्या पुरुषाचे कोणी ऐकत नव्हते.
यातून सांगण्याचे तात्पर्य हेच की, ज्या प्रमाणे एखादा व्यक्ती स्त्रीच्या मान सन्मानाचा मनापासून विचार करतो, तिचा आदर करतो त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रियांनी पुरुषांचा त्याच रीतीचे आदर केला पाहिजे. कारण, निव्वळ या सन्मानाच्या बाबी पुरुषांनाच लागू होत नसतात तर प्रत्येक स्त्रियांनी सुध्दा याचे काटकसरीने पालन केले पाहिजे.
आज कित्येक मुला मुलींचे जे ते त्यांच्यातले मॅटर घडत असतात. त्याच्यांत वादविवाद होत असतात. पण त्यातही गुन्हेगार म्हणुन मुलगाच दोषी ठरतो. इकडे भलाही त्या मुलीची चूक असो. प्रत्येक आणि प्रत्येक, ज्या मुला मुलींच्या निर्लज्ज घटना घडत असतात त्यात मुलगाच गुन्हेगार म्हणून ठरवल्या जातं. घराशेजारचे सुध्दा म्हणतात की, हा मुलगाच तसा होता, यानेच त्या मुलीला फसवले. घराजवळचेच नाही तर त्या मुलीच्या घरचे सुध्दा त्या मुलाच्याच नावानी बोटं मोडत असतात. माझी मुलगी मुळीच तसली नाही त्या मुलानेच हिला भडकावल असणार..! असेही म्हणतात.
हो बरोबर आहे तुमचं, मात्र हाच विचार मुलाकडून सुध्दा कधी करुन बघा. त्यालाही भावना असतात. प्रत्येक काळी तोच दोषी नसतो आणि तो अपराधी असलाही तरी त्या घटनेची पूर्ण दखल घेतल्याशिवाय मुलालाच दोषी म्हणून ठरवू नका. माझा म्हणण्याचा उद्देश असाही नाही की, स्त्रीयांचा आदर करणं सोडावं. त्यांचा जसा तुम्ही मान- सन्मान करता त्याचप्रमाणे प्रत्येक पुरुषांचा सुध्दा करा. आपण म्हणत असतो बघा, मुलापेक्षा मुलगी बरी… असे का बरं म्हणत असतो आपण..? मुलाने काय कुणाचे वाईट केले आहे, जन्माला आलेला प्रत्येक मुलगा हा वाईटच असतो असे नाही. त्याला आपण वाईट करुन घेतो.
ज्याप्रमाणे एखादे आई वडील आपल्या मुलीचे विचार जाणून घेतात, तिला काय वाटतं काय नाही, या बाबींची विचारपूस करतात त्याचप्रमाणे आपल्या मुलाला सुध्दा प्रेमाने जवळ घेवून त्याला काय वाटतं, काय नाही याची दखल घ्या. त्यालाही वाटेल की, नाही बा आपले आई वडील आपल्यासाठी अवर्णनीय असे कष्ट सोसतात, त्याला आपल्याला वाया घालवायचे नाही आहे, तर मी सुध्दा माझ्या आई वडीलांसाठी मेहनत घेणार आणि माझ आयुष्य रेखाटनार. अशी उत्सुकता त्याच्या मनी जागी व्हायला हवी.
मुला मुलींनमध्ये अशी बरीचशी बंधने आहेत पण असे कुठेही लिहिलेले नाही की, स्त्री आहे तर तिचा सन्मान करावा आणि पुरुष असेल तर त्याला वाऱ्यावर सोडावं. असे नाही ना कुठे लिहिलेले, पण आपल्या प्रत्येकाच्या मनात तसे कोरलेले आहे. ज्याप्रमाणे एखादा पुरुष हा एखाद्या स्त्रीचा आपुलकीने मान सन्मान करतो त्याचप्रमाणे स्मरण ठेवून प्रत्येक स्त्रीने पुरुषांना आपल्या बरोबरीचाच मान द्यावा.
कारण, एखाद्या बाळाची माय जरी त्याची जन्मदाती असली तरी त्या बाळाच्या पुढील आयुष्याचा दाता हा एक पुरुषच असतो. पुरुषांचे ही अंत:करण विचारांनी पाझरत असतात, त्याला समजून घेत चला, एवढच.
मी, स्त्री पुरुषांमध्ये कुठलाही भेद दर्शवत नाही आहे कारण, हे सर्व लिहिणारी मी एक स्त्रीच आहे.
कोई उचा नहीं कोई नीचा नहीं, सब समान हैं |
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
_________________________
Comments