१. भानगढचा किल्ला, राजस्थान :
सर्वप्रथम आणि सर्वांत अधिक भयावह स्थळ जर कोणते असेल तर ते आहे राजस्थान मधील जयपूर नजीक आलेल्या अलवार जिल्ह्यात स्थित भानगढचा किल्ला. हा किल्ला केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिकदृष्ट्या जेवढे महत्त्व या किल्ल्याला प्राप्त नसेल झाले त्याहून अधिक या किल्ल्याच्या भुतिया अस्तित्वामुळे झाले आहे. एकेकाळी ऐश्वर्यसंपन्न असलेला, सर्वांत सुंदर, भव्य, दिव्य असा हा किल्ला शापित कसा झाला त्याबद्दल स्थानिकांमध्ये वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत. पण सगळ्यांचा त्यावर विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे.
असं म्हणतात रात्रीच्या वेळी कुणीही आतमध्ये नसतानासुद्धा तलवारीच्या खणखणाटाचा आणि लोकांच्या ओरडण्याचा आवाज येतो. असंसुद्धा म्हणतात कि या किल्ल्यातील अनेक खोल्यांमधून स्त्रियांच्या रडण्याचा तर कधी त्यांच्या बांगड्यांच्या किणकिणाटाचा आवाज येतो. कुणी म्हणतं भानगढ किल्ल्याच्या मागील बाजूस जो दरवाजा आहे, जिथे नेहमीच सगळ्यात जास्त अंधार असतो, तिथे सदा एक विशिष्ट सुगंध येतो. एवढंच नव्हे तर कधीकधी याविरुद्ध किल्ल्यात एवढी शांती पसरलेली असते कि आपल्याच श्वासांचा आवाज सुद्धा स्पष्ट ऐकू येईल. पण एवढ्यात अचानक जोरदार किंकाळ्या ऐकू येतात आणि ती भयप्रद शांतता भंग पावते.
ही अशी जागा आहे जिथे भीतीलासुद्धा भीती वाटावी. पण हा किल्ला नेमका शापित कसा झाला? याचा इतिहास काय होता? चला पाहुयात.
हा किल्ला आमेरचा राजा भगवंतदासने १५७३ च्या दशकात बनवला होता. राजा भगवंतदासचा लहान मुलगा आणि मुघल बादशहा अकबरच्या दरबारातील प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक राजा मानसिंगचा लहान भाऊ, माधोसिंगने या किल्ल्याला आपले निवासस्थान बनवले. या माधोसिंगला ३ मुले होती, सुजान सिंग, छत्र सिंग आणि तेज सिंग. यापैकी छत्रसिंग माधोसिंगनंतर भानगढचा शासक बनला. छत्रसिंगचा मुलगा म्हणजे अजबसिंग. अजबसिंगसुद्धा शाही मनसबदार होते. अजबसिंगने आपल्या नावावर अजबगढची निर्मिती केली आणि त्याची २ मुले, काबिल सिंग आणि जसवंतसिंग अजबगढमध्येच राहिले. पण त्याचा तिसरा मुलगा हरी सिंग भानगढमध्ये राहिला आणि नंतर भानगढच्या गादीवर बसला. माधोसिंगचे २ वंशज म्हणजे हरी सिंगची २ मुले औरंगजेबाच्या शासनकाळात मुसलमान बनले. त्यांना भानगढ दिला गेला. पण जेव्हा औरंगजेबानंतर मुघल कमजोर पडत गेले तेव्हा महाराज सवाई जयसिंगने त्या दोघांना मारून भानगढ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.
इतका रोचक इतिहास या किल्ल्याला लाभलेला आहे. पण तरीही अशा २ कथा आहेत ज्यामुळे भानगढ जास्त प्रसिद्ध आहे.
त्यातल्या प्रथम कथेनुसार, जेव्हा हा किल्ला निर्माणाधीन होता तेव्हा तिथे बालूनाथ नामक एक योगतपस्वी राहत होते. राजाने किल्ल्याच्या निर्माणाआधी त्यांची परवानगी घेतली होती. तेव्हा त्यांनी राजाला स्पष्ट सांगितलेले की कोणत्याही परिस्थितीत किल्ल्याची सावली त्यांच्या साधनेच्या स्थानावर पडली नाही पाहिजे. राजाने ही अट मंजूर केली होती. पण त्याच्या काही अतिमहत्वाकांक्षी अधिकाऱ्यांनी या गोष्टीला महत्त्व न देता ठरल्यापेक्षा अधिक उंच किल्ला बांधला. चारही बाजूंनी मजबूत तटबंदी बांधली गेली होती. उजव्या बाजूला अनेक हवेल्या होत्या. समोरच भव्य बाजारपेठ बांधलेली. या पेठेत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अगदी २-२ मजली उंच दुकानं होती. किल्ल्याच्या सर्वांत शेवटी दुहेरी संरक्षणात बांधला गेलेला भव्य तीन मजली राजवाडा होता. या किल्ल्याच्या चारही बाजूंनी डोंगर आहेत. त्यामुळे नेहमीच हा भाग अत्यंत सुंदर दिसतो. पावसाळ्यात तर हे दृश्य अप्रतिम सुंदर असते.
असा हा अतिभव्य किल्ला ऐश्वर्याचे प्रतीक समजला जात होता.
पण जे नको तेच झाले. या उंच किल्ल्याची सावली तपस्व्याच्या तपस्यास्थळावर पडलीच. त्यामुळे क्रोधीत होऊन बालुनाथ योग्याने श्राप दिला की हा किल्ला उध्वस्त होऊन जाईल.
याच श्रापामुळे भानगढची अशी वाईट अवस्था झाली अशी मान्यता आहे. आजही तिथे तपस्वी बालुनाथची समाधी पाहायला मिळते.
दुसऱ्या कथेनुसार एका काळ्या जादू करणाऱ्या तांत्रिकाच्या श्रापामुळे हा किल्ला उध्वस्त झाला. भानगढची राजकन्या रत्नावती अत्यंत सुंदर होती. तिच्या स्वयंवराची तयारी सुरु असताना तिथल्या एका दुष्ट तांत्रिकाची तिच्यावर नजर पडली. सिंघिया नावाचा हा तांत्रिक काळ्या जादूमध्ये निष्णात होता. त्याने राजकन्येला प्राप्त करण्यासाठी खूप काही केले पण राजकन्येने त्याला भीक घातली नाही. मग शेवटचा उपाय म्हणून सिंघियाने रत्नावतीच्या एका दासीला संमोहित केले आणि तिच्याकरवी एक अत्तराची बाटली (कुणी म्हणतं शृंगारासाठी सुगंधित तेलाची बाटली) मंत्रभारीत करून राजकन्येकडे पाठवली. हे मंत्रित अत्तर (किंवा तेल) अत्यंत प्रभावशाली होतं. ज्या क्षणी त्याचा वापर राजकन्या करेल त्याचक्षणी संमोहित होऊन ती तांत्रिकाकडे आली असती.
पण कुठून कसे न जाणे, राजकन्येला या योजनेबद्दल समजले आणि तिने ती बाटली एका विशालकाय पाषाणावर रागाच्या भरात आपटली. बाटली फुटली, अत्तर सर्वत्र सांडले. पण त्या मंत्रभारीत अत्तराचा स्पर्श होताच तो पाषाणखंड त्या मांत्रिकाच्या दिशेने जाऊ लागला. त्याची काळी जादू त्याच्यावरच उलटली होती. यापासून वाचण्याचा काहीच मार्ग शिल्लक नव्हता. शेवटी तो पाषाण तांत्रिकावर आदळला.
मरता मरता त्याने श्राप दिला की या किल्ल्यातले सगळे जण मृत्युमुखी पडतील, मृत्यू पावलेले सगळे जण त्याच किल्ल्यात आत्म्याच्या रूपात भूतयोनीत भटकत राहतील. त्यांना काळाच्या अंतापर्यंत दुसरा कोणताही जन्म मिळणार नाही. ते अतृप्त आणि बंदिस्तच राहतील. त्यांना मुक्ती मिळणार नाही. हा किल्ला उध्वस्त होईल.
नंतर अजबगढ आणि भानगढमध्ये युद्ध झाले. त्यात सगळेच जण मृत्युमुखी पडले. किल्ल्यातील कुणीच जिवंत राहिले नाही. तांत्रिकाचा श्राप खरा ठरला.
आता यातील सत्य काय ते माहित नाही. पण या दोन्ही घटनांवर स्थानिकांचा संपूर्ण विश्वास आहे. अनेक पर्यटकांना भयंकर अनुभव आलेत. पॅरामिलिटरी फोर्सेसने सुद्धा सर्वेक्षण केलं होतं. पण त्यातल्या सैनिकांनाही अशा विचित्र घटनांना सामोरं जावं लागलं. अनेक जण युट्युबला पाहून किंवा गूगलला बघून, ही अशी माहिती वाचून खरं खोटं करायला जातात. अनेकांनी शूट करण्याचा प्रयत्न केला, सूर्यास्तानंतर तिथे राहण्याचा प्रयत्न केला पण शेवटी जीव गमावण्याव्यतिरिक्त हाती काहीच लागले नाही.
शेवटी भारत सर्वेक्षण विभागाने सक्तीने मनाई केली सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी. तिथे एक टीम सतत तैनात असते. आता कुणालाही त्या वेळात तिथे प्रवेश करून दिला जात नाही.
या मालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे मेरठ, उत्तरप्रदेशमधील एक भूतबंगला. चला पाहुयात काय कहाणी आहे या बंगल्याची…
२. जी पी ब्लॉक, मेरठ
उत्तरप्रदेशातील मेरठ येथे कॅन्ट एरियामध्ये स्थित हा बंगला कधी काळी इंग्रजांच्या वास्तव्याचे ठिकाण होता. एक इंग्रज परिवार इथे राहत होता. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते इंग्रज बंगला रिकामा करून निघून गेले. तत्पूर्वी सोहनलाल म्हणून एक चौकीदार त्याच्या कुटुंबासहित १९४५ पासून इथे चौकीदारी करत होता. काही काळानंतर अगदी जवळच असलेल्या चौकात एक ऍक्सीडेन्ट झाला आणि त्यामध्ये दारोगा डिझूझा यांना मृत्यू आला. पण त्या ऍक्सिडेंटनंतरच काही दिवसांनी आजूबाजूच्या लोकांना तिथे आत्मा दिसू लागली, तिथे वेळीअवेळी कुणाच्या तरी असण्याचे भास होऊ लागले.
त्या इंग्रज परिवारानंतर जो तिथे राहायला आला त्याच्या मनात तिथे वावरत असलेल्या आत्म्याबद्दल दहशत निर्माण झाली. अगदी थोड्याच काळात त्याने तो बंगला रिकामा केला आणि त्यानंतर आजवर तो रिकामाच आहे. वेळेवर डागडुजी न झाल्याने, आणि वर्षानुवर्षे पडिकच राहिल्यामुळे तो बंगला कमी आणि ओसाड जागा जास्त वाटते.
लोकांच्या म्हणण्यानुसार डिसुझा यांची आत्मा लोकांकडे ब्रेड, बटर आणि अंडे मागायची. सकाळी सकाळी कामावर जाणारे लोक घाबरत घाबरत का होईना पण ब्रेड बटर आणि अंडे सोबत घेऊन यायचे आणि त्या चौकात ठेवून पुढे निघून जायचे. एकदा त्या वस्तू ठेवल्यानंतर कुणाचीही मागे वळून पाहायची हिंमत कधी झाली नाही पण थोड्याच वेळात त्या वस्तू तिथून गायब व्हायच्या.
पण अर्थातच आता त्या रस्त्याने कुणीही ये जा करीत नाही. त्यामुळे या ब्रेड बटर आणि अंड्याच्या कहाणीतील तथ्य कुणालाही समजणे आता शक्य नाही.
या बंगल्याबद्दल आणखीसुद्धा काही अफवा आहेत.
एक म्हणजे अनेकांनी इथे लाल साडीतील एका स्त्रीला पाहिले आहे. कधी खिडकीत तर कधी छतावर. तर कधी अनेकांनी चार मुलांना बंगल्यात मेणबत्तीच्या उजेडात बसून दारू पिताना पाहिले आहे.
इतरवेळी ही दृश्ये अगदी साधारण वाटतील पण अशा भूतबंगल्यात एकाएकी अशी दृशे दिसणे आणि ते ही वारंवार… प्रसंगांमध्ये काहीही बदल न होता… अशावेळी हे भीतीदायकच नाही का?
अशाच अनेक अफवांमुळे किंवा काही प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या कथनामुळे हळूहळू लोक हा रस्ता टाळत गेले. आणि आज तर सर्वसामान्य नागरिकाला या एरियामध्ये प्रवेशच वर्ज्य आहे. पण अर्थातच त्याचे कारण आत्म्यांचा वावर नसून हा एरिया कॅंटोन्मेंटचा आहे म्हणून…
एकेकाळी या एरियाची शान असलेली ही सुंदर वास्तू भीतीदायक बनली.
या बंगल्याचा चौकीदार सोहनलाल याचा मुलगा श्रवण त्यानेसुद्धा काही वर्ष तिथे चौकीदारी केली पण लवकरच तोसुद्धा ती जागा सोडून दुसरीकडे गेला. पण त्याच्या म्हणण्यानुसार त्याला इथे कधीही कोणतीही आत्मा दिसली नाही. त्याचे वडील १९४५ मध्ये पंजाबमधून आलेले. त्यांच्यानंतर त्याने रखवालदारी केली. पण एवढ्या वर्षांत त्याला काही जाणवले नाही. या कथा मोठ्या प्रमाणात तो तिथून निघून गेल्यावरच पसरायला सुरुवात झाली.
पण असे असले तरीही या बंगल्याची चर्चा सर्वदूर पसरलेली आहे. देशातील झपाटलेल्या स्थानच्या यादीत हे ठिकाण पहिल्या १० मध्ये येते. यावर सर्वसामान्यच नाही तर इतिहासकारांपर्यंत सगळ्यांनीच या बंगल्याची चर्चा केली आहे.
इतिहासकार डॉक्टर के के शर्मा यांच्यानुसार या बंगल्याच्या कहाणीचा काहीही ठोस पुरावा नाही. लोकांच्या कपोकल्पित चर्चांच्या आधारावर या अफवा पसरल्या आहेत.
राजकीय संग्रहालयाचे अध्यक्ष डॉक्टर मनोज गौतम यांच्या म्हणण्यानुसारसुद्धा या सगळ्या अफवाच आहेत. आज कुणीही प्रत्यक्षदर्शी सत्य ते काय सांगायला जिवंत नाही.
३. कुलधरा, जैसलमेर (राजस्थान)
भारताच्या पारंपारिक भूमीत अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत, जी अनेक वर्षांनंतर किंवा शतकानुशतके होऊनही पूर्वीसारखीच ताजी आणि निराकरण न झालेली आहेत. ही रहस्ये अशी आहेत की आपण जितके जास्त ते सोडवण्याचा प्रयत्न कराल तितकेच ते गोंधळात पाडतील.
असेच एक रहस्य राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील कुलधारा गावातही दडले आहे. गेल्या 170 वर्षांपासून हे गाव ओसाड पडले आहे. रात्री ओसाड झालेले गाव आणि शतकानुशतके लोक अजूनही समजू शकले नाहीत की हे गाव ओसाड होण्याचे रहस्य काय आहे.
कुलधरा गावाच्या उजाड होण्याबाबत एक विचित्र गूढ आहे. वास्तविक, कुलधराची कथा सुमारे 200 वर्षांपूर्वी सुरू झाली, जेव्हा कुलधरा हे अवशेष नव्हते, तर आजूबाजूची 84 गावे पालीवाल ब्राह्मणांनी वसलेली होती. पण नंतर कुलधरावर कोणाची तरी वाईट नजर पडली, ती व्यक्ती म्हणजे रियासतचा दिवाण सलाम सिंग. अय्याश दिवाण सलाम सिंग ज्याची घाणेरडी नजर गावातील एका सुंदर मुलीवर पडली. दिवाण त्या मुलीच्या मागे इतका वेडा झाला होता की त्याला तिला कसेही करून मिळवायचे होते. यासाठी त्यांनी ब्राह्मणांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. हद्द तर अशी झाली की सत्तेत असलेल्या दिवाणने मुलीच्या घरी निरोप दिला की पुढच्या पौर्णिमेपर्यंत मुलगी मिळाली नाही तर गावावर हल्ला करून मुलीला उचलून नेऊ.
दिवाण आणि गावकरी यांच्यातील हा लढा आता कुमारी मुलीच्या सन्मानासाठी आणि गावाच्या स्वाभिमानासाठीही होता. गावाच्या चौपाल येथे पालीवाल ब्राह्मणांची बैठक झाली आणि 5000 हून अधिक कुटुंबांनी त्यांच्या सन्मानासाठी संस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. असे म्हटले जाते की सर्व 84 गावकरी निर्णय घेण्यासाठी एका मंदिरात जमले आणि पंचायतींनी निर्णय घेतला की काहीही झाले तरी ते आपली मुलगी दिवाणकडे देणार नाहीत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कुलधरा असा निर्मनुष्य होता की आज त्या गावाच्या हद्दीत पक्षीही शिरत नाहीत. असे म्हणतात की गाव सोडताना त्या ब्राह्मणांनी या जागेला शाप दिला होता. बदलत्या काळानुसार ८२ गावे नव्याने निर्माण झाली, मात्र सर्व प्रयत्न करूनही आजतागायत कुलधरा आणि खाभा ही दोन गावे लोकवस्तीत आलेली नाहीत. ही गावे आता भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहेत, जी दिवसाच्या प्रकाशात पर्यटकांसाठी दररोज उघडली जातात.
असे म्हणतात की हे गाव अध्यात्मिक शक्तींच्या ताब्यात आहे. प्रेक्षणीय स्थळ म्हणून बदललेल्या कुलधरा गावाला भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार येथे राहणाऱ्या पालीवाल ब्राह्मणांचा आवाज आजही ऐकू येतो. तिथे त्यांना सतत कोणीतरी फिरत असल्याचा भास होतो. बाजाराच्या गजबजाटाचे आवाज येतात, बायकांचे बोलण्याचे आवाज येतात आणि त्यांच्या बांगड्या-पैंजणाचा आवाज नेहमीच येत असतो. या गावाच्या हद्दीवर प्रशासनाने एक गेट बांधले असून, त्याद्वारे दिवसा पर्यटक येत असतात, मात्र रात्रीच्या वेळी हे गेट ओलांडण्याची हिंमत कोणी करत नाही.
कुलधरा गावात आजही शापमुक्त मंदिर आहे. त्या काळी पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेली एक पायरी विहीर देखील आहे. नीरव कॉरिडॉरमध्ये खाली जाणाऱ्या काही पायऱ्या देखील आहेत, असे म्हणतात की संध्याकाळनंतर येथे काही आवाज ऐकू येतात. लोक मानतात की तो आवाज 18 व्या शतकातील त्या वेदनांचा आहे, ज्यातून पालीवाल ब्राह्मण गेले. गावात अशी काही घरे आहेत, जिथे अनेकदा गूढ सावल्या नजरेसमोर येतात. दिवसाच्या प्रकाशात, सर्व काही इतिहासातील कथेसारखे दिसते, परंतु संध्याकाळच्या वेळी, कुलधाराचे दरवाजे बंद होतात आणि आध्यात्मिक शक्तींचे एक रहस्यमय जग दिसते. रात्रीच्या वेळी जो कोणी येथे आला तो अपघाताचा बळी ठरल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
मे २०१३ मध्ये दिल्लीहून भूत आणि आत्म्यांवर संशोधन करणाऱ्या पॅरानॉर्मल सोसायटीच्या टीमने कुलधरा गावात रात्र काढली. संघाने कबूल केले की येथे काहीतरी असामान्य नक्कीच आहे. संध्याकाळी त्यांचा ड्रोन कॅमेरा आकाशातून गावाचे फोटो काढत होता, मात्र त्या पायरीवर येताच हवेत खाली येत कॅमेरा जमिनीवर पडला. जणू तिथे असे कुणी होते ज्याला हे मंजूर नव्हते. कुलधरामधून हजारो कुटुंबे स्थलांतरित झाली हे खरे आहे, आजही कुलधरामध्ये राजस्थानी संस्कृतीचे दर्शन घडते.
पॅरानॉर्मल सोसायटीचे उपाध्यक्ष अंशुल शर्मा यांनी सांगितले की, आमच्याकडे घोस्ट बॉक्स नावाचे एक उपकरण आहे. याद्वारे आम्ही अशा ठिकाणी राहणाऱ्या आत्म्यांना प्रश्न विचारतो. कुलधारामध्येही त्याने असेच केले, जिथे काही आवाज आले आणि काही विलक्षण आत्म्यांनी त्यांची नावेही सांगितली. ४ मे २०१३ (शनिवार) रात्री कुलधरा येथे गेलेल्या टीमच्या वाहनांवर मुलांच्या हाताचे ठसे आढळून आले. कुलधरा गावात फेरफटका मारून टीमचे सदस्य परत आले तेव्हा त्यांच्या वाहनांच्या काचांवर मुलांच्या पंजाच्या खुणाही दिसत होत्या. (कुलधराला गेलेल्या टीमच्या सदस्यांनी मीडियाला सांगितलं)
पण हेही खरं आहे की कुलधरामधल्या भूत-प्रेतांच्या कथा हे केवळ एक मिथक आहे.
इतिहासकारांच्या मते, पालीवाल ब्राह्मणांनी त्यांची संपत्ती, ज्यामध्ये सोने, चांदी आणि हिरे आणि दागिने मोठ्या प्रमाणात होते, जमिनीखाली दफन केले होते. यामुळेच येथे जो कोणी येतो तो जागोजागी खोदकाम करू लागतो. कदाचित ते सोने त्यांच्या हातात असेल या आशेने हे गाव आजही ठिकठिकाणी खोदलेले आढळते.
४. डाऊ हिल्स, पश्चिम बंगाल
कोलकाता पासून सुमारे ५८७ किमी अंतरावर असलेले कुर्सियांग, पश्चिम बंगालच्या निवडक सर्वात सुंदर डोंगराळ भागात गणले जाते. सुंदर टेकड्यांमध्ये वसलेले, कुर्सियांग समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 मीटर उंचीवर वसलेले आहे. हे भव्य हिल स्टेशन वसवण्याचे श्रेय भारतात ब्रिटिशांना जाते. कुर्सियांगच्या आजूबाजूला अनेक सुंदर टेकड्या आहेत, त्यापैकी एक डाऊ हिल्स आहे. डाऊ हिल्स नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीने अतिशय प्रगत मानली जाते.
पण त्याच्या नैसर्गिक सौंदर्याव्यतिरिक्त, ही टेकडी तिच्या झपाटलेल्या अनुभवांसाठी देखील खूप कुप्रसिद्ध आहे. कदाचित खूप कमी लोकांना याची जाणीव असेल की अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे असामान्य अनुभव/नकारात्मक ऊर्जा आली आहे.
डाऊ हिल, भारतातील सर्वात झपाटलेले हिल स्टेशन दार्जिलिंगपासून सुमारे ३० किमी अंतरावर कुर्सियांग येथे आहे. हा डोंगराळ प्रदेश त्याच्या विलक्षण अनुभवांसाठी आजूबाजूच्या भागात खूप कुप्रसिद्ध आहे. या टेकडीशी अनेक भयानक कथा निगडीत आहेत. अनेकदा पर्यटक दार्जिलिंगला भेट देण्यासाठी येतात, परंतु अनेकांना या टेकडीच्या इतर पैलूंबद्दल माहिती नसते. ऑर्किड आणि चहाचे मळे आणि पर्वतीय सौंदर्याव्यतिरिक्त, कुर्सियांग हे रोड ऑफ डेथ, फिरणारी भुते, पछाडलेल्या शाळा आणि अगणित खऱ्या भूत कथांचे घर आहे.
पर्वतीय सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या डाऊ हिल्स आपल्या भयानक अनुभवांमुळे नेहमीच चर्चेत असतात. येथे एक डोंगरी रस्ता आहे ज्याला मृत्यूचा रस्ता असे नाव देण्यात आले आहे. हा रस्ता डाऊ हिल ते फॉरेस्ट ऑफिस दरम्यान असल्याचे सांगितले जाते. येथे अनेकदा गावातील लाकूडतोडे लाकडे तोडण्यासाठी जंगलात येतात, तेथून हा रस्ता जातो. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की त्यांनी येथे शिरच्छेद केलेला मुलगा चालताना आणि धावताना पाहिला आहे.
या मानकाप्या भूताच्या नावाशी अनेक भयानक स्थानिक कथा जोडल्या गेल्या आहेत. हे फिरणारे भूत अचानक कोणाचाही पाठलाग करू लागल्याचे स्थानिक लोक सांगतात. लोकांनी या घटनेत अनेक भयानक रात्रींचा उल्लेख केला आहे. लोकांनी असेही सांगितले आहे की एक वाईट शक्ती लोकांकडे लाल डोळ्यांनी पाहते. याशिवाय इतर कोणाच्या तरी आत्म्याच्या अस्तित्वाचा उल्लेखही लोकांनी केला आहे. ती बाई संध्याकाळनंतर या निर्जन रस्ते किंवा जंगलात दिसते.
डाऊ हिल्सची जंगले खरोखरच खूप भीतीदायक भावना निर्माण करतात. या जंगलांतील हवा राक्षसी आहे, असे लोक मानतात. असे मानले जाते की जंगलातील काही भाग शापित आहेत, जो कोणी तेथे जाण्याचा प्रयत्न करतो तो शांतता गमावतो. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की कधीकधी एखादी व्यक्ती मानसिक संतुलन गमावते आणि स्वत:ला मारण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे दाट जंगलात जाण्यास स्थानिक लोकांकडून पर्यटकांना अनेकदा मनाई केली जाते.
डाऊ हिल्सच्या जंगलांमध्ये वसलेले, १०० वर्षे जुने व्हिक्टोरिया बॉईज हायस्कूल हे टेकडीच्या निवडक झपाटलेल्या ठिकाणांमध्ये गणले जाते. या ठिकाणाभोवती अनेक अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ज्यांच्या वाईट शक्तींचा प्रभाव या शाळेवरही आहे. हिवाळ्यात ही शाळा बंद असते. ही शाळा बंद असताना या शाळेतून ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येतो, असे स्थानिकांचे मत आहे.
डिसेंबर ते मार्च महिना या शाळेमध्ये खूप भीतीदायक वाटतो. कुर्सियांग हे ठिकाण सुंदर असले तरी तिची भितीदायक बाजू दुर्लक्षित करता येणार नाही.
कुर्सियांग कोलकाता पासून ५८७ किमी अंतरावर आणि दार्जिलिंग पासून ३० किमी अंतरावर आहे. तिन्ही मार्गांनी तुम्ही येथे पोहोचू शकता. सर्वात जवळचे विमानतळ बागडोगरा विमानतळ आहे, याशिवाय तुम्ही कोलकाता विमानतळाचाही आधार घेऊ शकता. रेल्वे मार्गासाठी, तुम्ही कुर्सियांग रेल्वे स्टेशनचा आधार घेऊ शकता. कुर्सियांग रेल्वे स्टेशन भारतातील अनेक प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे. याशिवाय रस्त्यानेही येथे जाता येते. तुम्ही सिलीगुडी मार्गे येथे पोहोचू शकता.
५. ब्रिजभवन, कोटा (राजस्थान)
भारतात अशी अनेक झपाटलेली ठिकाणे आहेत, जिथे कोणी चुकूनही जाण्याचा प्रयत्न करत नाही. या भागात आज आपण ब्रिजभवन इमारतीबद्दल बोलणार आहोत. हे राजस्थानच्या कोटा शहरात आहे. ही ब्रिटिशकालीन हवेली होती, तिचे आता हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे. आज त्याचे नाव राजस्थानच्या प्रसिद्ध हॉटेल्समध्ये गणले जाते. जगभरातून अनेक लोक इथे येतात आणि राहतात.
या हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मते इथे कशाची तरी सावली आहे. हॉटेलमध्ये मुक्काम केलेल्या अनेक पर्यटकांपैकी अनेकांना आवाज जाणवला किंवा काही आत्म्याशी संबंधित घटना पाहिल्या. ब्रिजभवन हॉटेलमध्ये एका इंग्रजाचा आत्मा राहतो, असं म्हटलं जातं. या इंग्रजाची अनेक वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी त्याच्या दोन मुलांसह हत्या झाली होती.
ब्रिजभवनला एक गूढ इतिहास आहे. चंबळ नदीजवळ १८५७ च्या सुमारास ही इमारत बांधण्यात आली. त्या काळात हिंदू-मुस्लिम यांच्यात खूप वाद व्हायचे. याचा फायदा घेऊन ब्रिटीश सरकार हिंदूंच्या मंदिराबाहेर गोमांस आणि मशिदीसमोर डुकराचे मांस फेकत असे.
त्यामुळे हिंदू-मुस्लिम यांच्यातील भांडण वाढले आणि त्याचा फायदा ब्रिटिश सरकारला झाला. तथापि, १८५७ मध्ये, भारतीय सैनिकांमध्ये एक अफवा पसरली की त्यांच्या बंदुकांमध्ये गोमांस आणि डुकराचे मांस वापरले जाते. यामुळे सैन्य संतप्त झाले आणि त्यांनी एकजुटीने ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड सुरू केले.
असे म्हणतात की बंड सुरू झाले तेव्हा मेजर चार्ल्स बर्टन आणि त्यांची दोन जुळी मुले ब्रिज भवन (कोटा रेसिडेन्सी) येथे राहत असत. बंडाच्या वेळी सैनिकांनी या इमारतीला चारही बाजूंनी वेढा घातला आणि आत घुसून मेजर चार्ल्स बर्टन आणि त्यांच्या मुलांवर वार केले. तेव्हापासून या इमारतीत मेजरचा आत्मा वावरत असल्याचे सांगितले जाते. त्याच्या आत्म्याला अजून शांती मिळालेली नाही.
कोटाच्या राणीनेही आपल्या ड्रॉईंग रूममध्ये मेजर चार्ल्स बर्टनचे भूत अनेकदा पाहिल्याचा दावा केला होता. राणीच्या म्हणण्यानुसार, मेजरच्या आत्म्याने तिला कधीही इजा करण्याचा प्रयत्न केला नाही. ब्रिज भवन आता कोटा स्टेट गेस्ट हाउस बनले आहे. येथे काम करणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, हॉटेलच्या गॅलरीत अनेकदा कोणीतरी चालल्याचा आवाज येतो. रात्रीच्या वेळी जर कोणी रूफटॉप गार्डनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर मेजरचे भूत त्याला जोरात मारतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या या वक्तव्यात किती तथ्य आहे, हे कोणालाच माहीत नाही.
Comments